ग्रामपंचायत ब्राह्मणी / खडकीत पिण्याच्या पाण्यासाठी वाद पेटला
जुन्या पाणी टाकीच्या दुरुस्तीवरून ग्रामस्थ आक्रमक; तत्काळ काम थांबवले
ब्राह्मणी / खडकी, ता. सडक अर्जुनी : ब्राह्मणी / खडकी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, गावातील जुन्या पाणी टाकीच्या दुरुस्तीच्या कामावरून ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मुख्य ब्राह्मणी गावातील जुन्या पाणी टाकीला प्लास्टर करण्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत सुरू करण्यात आले होते. तसेच तात्पुरते कॉलम उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, या कामाची माहिती गावातील काही नागरिकांना मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत डागडुगीचे काम थांबविले.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जुन्या पाणी टाकीच्या सुरक्षिततेचा आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याचा योग्य विचार न करता दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कामाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून ब्राह्मणी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्यातच नव्हे तर आता पावसाळ्यातही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावातील नागरिकांची मागणी आहे की, पाणीपुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा, जुन्या पाणी टाकीची तांत्रिक तपासणी करूनच दुरुस्ती करावी किंवा नवीन टाकी उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे ब्राह्मणी / खडकी गावात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून वातावरण तापले असून, ग्रामपंचायत प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

