सडक अर्जुनीत अमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा प्रहार; लाखोंचा गांजा जप्त
गोंदिया LCB ची धडक कारवाई; ५.६६६ किलो हिरवा ओलसर गांजासह महिला अटकेत, सुमारे ₹५८.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
सडक अर्जुनी | प्रतिनिधी :
गोंदिया जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा व दुग्गीपार पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा फुटाळा (सौंदड) येथे धाड टाकून ५.६६६ किलो हिरवा ओलसर गांजा जप्त केला. या कारवाईत अनिता अशोक मोहनकर (वय ५२ वर्षे) यांना अटक करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹५८,५६,५०० असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस अधीक्षक गौरव भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी महिला घराच्या परिसरात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता प्लास्टिकच्या पोत्यात व झाडांवर वाळत घातलेला ५.६६६ किलो हिरवा ओलसर गांजा आढळून आला. त्यानंतर संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपी महिलेविरुद्ध दुग्गीपार पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जगमवार, तुलशीराम लुटे, प्रकाश गायकवाड, दुर्गेश तिवारी, सुनील डहाके, गणेश कुडसुकर आणि विलास ठाकरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

