सडक अर्जुनी नगरपंचायतीकडून प्लास्टिक बंदीबाबत जाहिर आवाहन
सडक अर्जुनी : शहरात प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान लक्षात घेता नगर पंचायत सडक अर्जुनी यांच्या वतीने नागरिक, व्यापारी व दुकानदारांसाठी प्लास्टिक बंदीबाबत जाहिर आवाहन करण्यात आले आहे.
नगरपंचायतीने एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. प्लास्टिक कॅरीबॅगऐवजी कापडी व कागदी पिशवी, प्लास्टिक कपाऐवजी कागदी व स्टील कप, प्लास्टिक प्लेटऐवजी पत्रावळी, कागदी व स्टील प्लेट तसेच प्लास्टिक चमचे, काटे व सुरीऐवजी लाकडी किंवा इतर पर्यावरणपूरक पर्याय वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरपंचायतीच्या जाहिर आवाहनानुसार प्लास्टिक बंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पहिल्या उल्लंघनासाठी ₹5,000, दुसऱ्या उल्लंघनासाठी ₹10,000 आणि तिसऱ्या उल्लंघनासाठी ₹25,000 दंड आकारण्यात येणार आहे. तिसऱ्या उल्लंघनानंतर तीन महिन्यांपर्यंत कारवाईची तरतूद असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
“नको प्लास्टिक, नको प्रदूषण, कापडी पिशवी हेच खरे भूषण!” असा संदेश देत सर्व व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी एकल प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा, तसेच खरेदीसाठी जाताना कापडी पिशवी बाळगावी आणि नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

