२० हजारांची लाच घेताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात; दोन वनरक्षकही ताब्यात
रेती वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी; अर्जुनी मोरगाव तालुक्यात खळबळ
गोंदिया : रेती उपसा व वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गोंदिया पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात आणखी दोन वनरक्षकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी राजुली सावनक्षेत्रातील पारसटोला कार्यालयात करण्यात आली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, रमेश सखाराम पचारे (वय ५७), वनपाल, राजुली सावनक्षेत्र, वनपरिक्षेत्र गोठणगाव; निलोत्पल हिरालाल शिकारे (वय ३१), वनरक्षक, पारसटोला आणि चिंटू मंगलसिंग परिहार (वय ३८), वनरक्षक, राजुली सावनक्षेत्र अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
२४ वर्षीय तक्रारदाराच्या घराचे बांधकाम सुरू आहे. मार्च २०२६ मध्ये घरासाठी गावाशेजारील नाल्यातून रेती आणत असताना वनपाल पचारे यांनी त्याचा ट्रॅक्टर अडवून रेती उपसा व वाहतुकीची कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर ९ जुलै रोजी तक्रारदार रॉयल्टीची वाळू घरी टाकून रिकामा ट्रॅक्टर शेताकडे घेऊन जात असताना पचारे व शिकारे यांनी ट्रॅक्टर अडविल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी ट्रॅक्टरची चावी काढून घेत गुन्हा दाखल न करण्यासाठी पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी तक्रारदाराला ८ ऑगस्टला पारसटोला राऊंड कार्यालयात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. तक्रारदार कार्यालयात गेल्यानंतर कथित ‘सेटलमेंट’साठी २५ हजारांऐवजी २० हजार रुपये देण्याची मागणी झाल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
### पडताळणीनंतर एसीबीचा सापळा
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने ११ ऑगस्ट रोजी पंचांच्या उपस्थितीत लाच मागणीची पडताळणी केली. एसीबीच्या अहवालानुसार, या पडताळणीदरम्यान तिन्ही आरोपींनी तक्रारदाराविरुद्ध रेती उपसा व वाहतुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराला पंच व व्हॉइस रेकॉर्डरसह २० हजार रुपयांची लाच रक्कम घेऊन राजुली सावनक्षेत्रातील पारसटोला कार्यालयात पाठविण्यात आले. यावेळी वनपाल रमेश पचारे यांनी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप असून एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यावेळी उपस्थित असलेले वनरक्षक निलोत्पल शिकारे आणि चिंटू परिहार यांनाही ताब्यात घेण्यात आले.
तिन्ही आरोपींविरुद्ध किशोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाचे पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत उगले यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

