डोंगरगाव महामार्ग पोलीस केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत ‘मृत्युंजय दूतां’चा सन्मान; ‘ऑपरेशन यू-टर्न’मुळे अपघातांमध्ये घट
गोंदिया : महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ७.१५ वाजता राजू बस्तवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक रंजित मट्टामी, अनेश राठोड, संजय संतोषवार यांच्यासह १७ पोलीस अंमलदार तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. लोहित मतानी, पोलीस अधीक्षक, महामार्ग प्रादेशिक विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करणाऱ्या ‘मृत्युंजय दूतां’चा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये गुरुदेवसिंग उर्फ मुन्ना ठाकूर, सुरज सोनवणे, सागर कोटांगले, शैलेश थेर तसेच भंडारा टोल वे चे व्यवस्थापक श्री. संजय रॉय सर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महामार्गावरील अपघातांच्या वेळी जखमींना वेळेत मदत मिळावी, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात यावे आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचावेत, या सामाजिक कार्याची दखल घेत या ‘मृत्युंजय दूतांचा’ गौरव करण्यात आला.
यावेळी सडक-अर्जुनी तालुक्यातील पत्रकार बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या.
‘ऑपरेशन यू-टर्न’मुळे अपघातांवर नियंत्रण
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी डॉ. लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ‘ऑपरेशन यू-टर्न’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी, वाहन तपासणी तसेच वाहनचालकांमध्ये व्यापक जनजागृती केली जात आहे.
या विशेष मोहिमेमुळे मागील दोन महिन्यांत जिल्ह्यातील रस्ते अपघातांच्या संख्येत घट झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बस्तवाडे यांनी दिली.
तसेच महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून, काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार बांधवांना दिली.
महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी पोलीस विभागासोबतच नागरिक, पत्रकार, टोल प्रशासन व ‘मृत्युंजय दूत’ यांची भूमिका महत्त्वाची असून, सामूहिक प्रयत्नांमुळे रस्ते अधिक सुरक्षित करण्यास मदत होत आहे.

