आंघोळीचा मोह जीवावर बेतला; मंदीटोला येथील तरुणाचा कालव्यात अंत
देवरी – पुजारीटोला धरणाच्या कालव्यात आंघोळीसाठी उतरलेल्या मंदीटोला येथील एका तरुणाचा पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास घडली.
मृत तरुणाचे नाव गौरव फेंदुलाल मडावी (वय २५, रा. मंदीटोला, सडक अर्जुनी) असे आहे. गौरव हा बिजेपार येथे नातेवाईकांच्या देवकारण कार्यक्रमासाठी आला होता. कार्यक्रमादरम्यान मित्रांसह तो गावाजवळील पुजारीटोला धरणाच्या कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेला होता. कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत असताना तो पाण्यात उतरला असता अचानक त्याचा तोल गेला आणि तो वाहत्या पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलिस व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कालव्यात पाण्याचा वेग अधिक असल्याने शोधकार्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर पाणी बंद करून स्थानिक युवकांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली.
सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून पुढील तपास सालेकसा पोलिसांकडून सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे मंदीटोला परिसरात शोककळा पसरली आहे.

