सडक अर्जुनीत उद्या महसूल शिबिर चे आयोजन
गोंदिया : नागरिकांच्या प्रलंबित महसूलविषयक कामांचा त्वरित निपटारा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महसूल व वन विभागाच्या पुढाकाराने राज्यभरात २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘महसूल जनकल्याण शिबिर’ आयोजित करण्यात येत आहेत.
याच उपक्रमांतर्गत १ ऑगस्ट रोजी गोंदिया येथे, तर २ ऑगस्ट रोजी सडक अर्जुनी येथे महसूल जनकल्याण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूलविषयक विविध कामांचा एकाच ठिकाणी निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शिबिरांच्या आयोजनापूर्वी लाभार्थ्यांची प्राथमिक तपासणी, पात्रता पडताळणी तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या प्रलंबित महसूलविषयक कामांसाठी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे महसूल विभागाच्या सेवा नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध सेवांसोबतच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आयुष्मान भारत योजना, वनपट्टे व भूमिपट्ट्यांचे वितरण तसेच इतर महत्त्वपूर्ण शासकीय योजनांचा लाभ पात्र व गरजू नागरिकांना देण्यात येणार आहे.
या शिबिरामुळे नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार चकरा मारण्याची गरज भासणार नसून, एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ मिळणार आहे. महसूल विभागाच्या या जनकल्याणकारी उपक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

