नागझिरा ब्लॉकमधील अस्वलच्या हल्ल्यात वनरक्षकाचा जागीच मृत्यू; कर्मचारी वर्गात असंतोष, चौकशीची मागणी
गोंदिया, दि. ५ ऑगस्ट २०२६ :
नवेगाव–नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत नागझिरा ब्लॉकमधील उमरझरी वनपरिक्षेत्रातील रिसाडा बिटचे वनरक्षक शामू शरणागत यांचे आज (दि. ५ ऑगस्ट २०२६) सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास अस्वलच्य हल्ल्यात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर वन कर्मचारी व वनमजूर वर्गात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्मचारी वर्गाच्या म्हणण्यानुसार, एप्रिल २०२६ पासून नव्याने बफर क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान स्थानिक ग्रामपंचायती व ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात गस्ती व्यवस्थेमध्ये असमानता असल्याचा आरोप काही कर्मचारी करत आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार, नागझिरा ब्लॉकमधील नागझिरा, उमरझरी, सडक-अर्जुनी, तिरोडा, कोका व गडेगाव या वनपरिक्षेत्रांमध्ये गस्तीसाठी प्रत्येक कॅम्पवर केवळ एक वनमजूर देण्यात आला, तर नवेगाव ब्लॉकमध्ये काही ठिकाणी दोन वनमजूर उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे
यापूर्वीही नागझिरा परिसरात गस्तीदरम्यान अस्वलाच्या हल्ल्यात दोन वनमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे संवेदनशील क्षेत्रात गस्ती करताना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी कर्मचारी वर्गाकडून वेळोवेळी करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
वन कर्मचारी व वनमजूर वर्गात अशी मागणी होत आहे की, शामू शरणागत यांच्या मृत्यूच्या परिस्थितीची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, गस्ती व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करावे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व सुरक्षा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. चौकशीनंतरच या घटनेमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले व वनरक्षकाचा मृत्यूदेह
सर्वविच्छेदनासाठी पाठविण्यात आला समोर ची कार्यवाही वनविभाग करत आह

