पत्रकारितेत संवेदना आणि सत्यनिष्ठा महत्त्वाची; महाराष्ट्र केसरी न्यूज व रुद्रसागर न्यूज पेपरचा वर्धापन दिन उत्साहात कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव; मान्यवरांकडून निर्भीड, संवेदनशील आणि जनहिताच्या पत्रकारितेचा जागर

शिक्षा

 

पत्रकारितेत संवेदना आणि सत्यनिष्ठा महत्त्वाची; महाराष्ट्र केसरी न्यूज व रुद्रसागर न्यूज पेपरचा वर्धापन दिन उत्साहात

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव; मान्यवरांकडून निर्भीड, संवेदनशील आणि जनहिताच्या पत्रकारितेचा जागर

सडक अर्जुनी : पत्रकारिता हे केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजाच्या सुख-दुःखाशी जोडलेली महत्त्वाची जबाबदारी आहे. पत्रकाराने समाजातील वास्तव, सर्वसामान्यांच्या वेदना आणि प्रश्न संवेदनशीलतेने समजून घेत सत्य समाजासमोर मांडले पाहिजे, असा सूर महाराष्ट्र केसरी न्यूज आणि रुद्रसागर न्यूज पेपरच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनातून उमटला, सोबत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रुद्रसागर न्यूज पेपर चे विमोचन करण्यात आले. 

महाराष्ट्र केसरी या डिजिटल न्यूज चॅनलने आठ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करून नवव्या वर्षात, तर रुद्रसागर न्यूज पेपरने सात वर्षे पूर्ण करून आठव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने ६ ऑगस्ट रोजी वर्धापन दिन व सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, विविध क्षेत्रांत स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या, पदोन्नती प्राप्त तसेच समाजाला नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा दरवर्षी वर्धापन दिनाच्या औचित्याने गौरव करण्यात येतो. हीच परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली.

पत्रकारितेत संवेदना असणे गरजेचे – आमदार अविनाश ब्राम्हणकर

कार्यक्रमातील सत्कारमूर्ती नवनिर्वाचित आमदार अविनाश ब्राम्हणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पत्रकारितेतील संवेदनशीलतेवर विशेष भर दिला. पत्रकारिता हे केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजाच्या सुख-दुःखाशी जोडलेली एक महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे पत्रकारिता करताना पत्रकारांमध्ये संवेदना असणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पत्रकाराने समाजातील प्रश्नांकडे केवळ बातमी म्हणून न पाहता त्यामागील मानवी भावना आणि वास्तव समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र केसरी न्यूज आणि रुद्रसागर न्यूज पेपरच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण टीमला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

पत्रकारितेची लोकशाहीतील जबाबदारी महत्त्वाची – माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे

माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मंचावरून उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करत पत्रकारितेचे समाजातील महत्त्व आणि लोकशाही व्यवस्थेतील जबाबदारी यावर आपले विचार व्यक्त केले. सर्वसामान्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र केसरी न्यूज आणि रुद्रसागर न्यूज पेपरने सत्यनिष्ठ व जनहिताची पत्रकारिता यापुढेही अधिक जोमाने सुरू ठेवावी, अशा सदिच्छा व्यक्त करत त्यांनी वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

पत्रकारिता समाजाचा आरसा – डॉ. गुणवंत भडके

सहाय्यक आयुक्त तथा तालुका पशुचिकित्सक डॉ. गुणवंत भडके यांनी पत्रकारितेला समाजाचा आरसा संबोधत पत्रकारांनी समाज व व्यवस्थेतील त्रुटी निर्भीडपणे समोर आणणे आवश्यक असल्याचे सांगितले.

“पत्रकारिता ही समाजाचा आरसा आहे. समाज आणि व्यवस्थेतील त्रुटी व चुका दाखविणे हे पत्रकारांचे काम आहे. पत्रकारांनी वस्तुस्थिती समोर आणल्यानंतर त्या चुका दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यातूनच अनेक विकासकामांना चालना मिळते,” असे मत डॉ. भडके यांनी व्यक्त केले. त्यांनी दोन्ही माध्यमांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कर्तृत्ववानांचा सन्मान प्रेरणादायी – आनंद चंद्रिकापुरे

माऊली फाउंडेशनचे संचालक तथा अध्यक्ष आनंद चंद्रिकापुरे यांनी वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्कार उपक्रमाचे कौतुक केले. ज्यांनी आपल्या कार्यातून समाजाला ऊर्जा आणि प्रेरणा दिली तसेच स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर मोठे स्थान निर्माण केले, अशा व्यक्तींचा या व्यासपीठावर सन्मान करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

“समाजाला ऊर्जा देणाऱ्या आणि स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे झालेल्या व्यक्तींचा सन्मान करणे ही निश्चितच अभिमानास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी बाब आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत हा उपक्रम भविष्यातही सुरू राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोकशाही सक्षम करण्यासाठी निर्भीड पत्रकारिता आवश्यक – शैलेश जयस्वाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल यांनी पत्रकारितेचे महत्त्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, समस्या आणि त्यांच्या भावना शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी निर्भीड आणि जनहिताची पत्रकारिता आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी महाराष्ट्र केसरी न्यूज आणि रुद्रसागर न्यूज पेपरच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

सत्य प्रत्येकाला पचत नाही; तरीही सत्य मांडलेच पाहिजे – चेतन वळगाये

पंचायत समिती सडक अर्जुनीचे सभापती चेतन वळगाये यांनी पत्रकारितेतील सत्यनिष्ठा आणि पत्रकारांच्या खडतर प्रवासावर भाष्य केले. “सत्य गोष्ट प्रत्येकालाच पचते असे नाही. मात्र पत्रकारिता करताना कोणत्याही दबावाला बळी न पडता वस्तुस्थिती आणि सत्य समाजासमोर मांडावेच लागते,” असे त्यांनी सांगितले.

पत्रकारितेचा प्रवास हा अत्यंत खडतर आणि आव्हानांनी भरलेला असतो. अनेक अडचणी व संघर्षांचा सामना करत पत्रकारांना सर्वसामान्यांचे प्रश्न आणि वास्तव समाजासमोर आणावे लागते. त्यामुळे पत्रकाराचे कार्य आणि त्यामागील संघर्ष समाजाने समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकारांचे – डॉ. रुकीराम वाढई

पंचायत समिती सडक अर्जुनीचे सदस्य डॉ. रुकीराम वाढई यांनी सर्वसामान्यांच्या समस्या आणि अपेक्षांना वाचा फोडण्यात पत्रकारितेचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

नागरिकांचे विविध प्रश्न शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात. समाजातील सकारात्मक बदल आणि विकासाच्या प्रक्रियेत पत्रकारिता महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

बबलू मारवाडे यांचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी – दिनेश हुकरे

माजी सरपंच दिनेश हुकरे यांनी महाराष्ट्र केसरी न्यूज व रुद्रसागर न्यूज पेपरचे संपादक बबलू मारवाडे यांच्या जीवनातील तसेच पत्रकारितेतील खडतर आणि संघर्षमय प्रवासावर आपली भूमिका व्यक्त केली.

अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करत पत्रकारितेच्या क्षेत्रात वाटचाल करणे सोपे नसते. संघर्षातून पुढे जात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे महत्त्वाचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकारिता कशी असावी, पत्रकाराने सत्य आणि वस्तुस्थितीशी प्रामाणिक राहून निर्भीडपणे जनतेचे प्रश्न मांडणे का आवश्यक आहे, यावर हुकरे यांनी विशेष भर दिला. बबलू मारवाडे यांनी संघर्षातून उभा केलेला पत्रकारितेचा प्रवास प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बारा वर्षांच्या पत्रकारितेतील चढ-उतारांना बबलू मारवाडे यांनी दिला उजाळा

महाराष्ट्र केसरी न्यूज व रुद्रसागर न्यूज पेपरचे संपादक बबलू मारवाडे यांनी मंचावरून बोलताना आपल्या जवळपास बारा वर्षांच्या पत्रकारितेतील संघर्षमय प्रवासाला उजाळा दिला. पत्रकारितेच्या या प्रदीर्घ वाटचालीत आलेले चढ-उतार, बदलत्या राजकीय परिस्थितीत जवळून पाहिलेल्या घडामोडी, सामाजिक प्रश्न, संघर्ष तसेच पत्रकार म्हणून अनुभवलेल्या अनेक प्रसंगांबाबत त्यांनी आपल्या भावना उपस्थितांसमोर व्यक्त केल्या.

महाराष्ट्र केसरी या डिजिटल न्यूज चॅनलने आठ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करून नवव्या वर्षात पदार्पण केले आहे, तर रुद्रसागर न्यूज पेपरने सात वर्षे पूर्ण करून आठव्या वर्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.

हा प्रवास केवळ दोन माध्यमांचा नसून त्यामागे वाचक, प्रेक्षक, हितचिंतक, जाहिरातदार, पत्रकार बांधव, मित्रपरिवार आणि सर्वसामान्य जनतेने दाखविलेला विश्वास असल्याची भावना मारवाडे यांनी व्यक्त केली.

जवळपास बारा वर्षांच्या पत्रकारितेत अनेक राजकीय व सामाजिक घडामोडी जवळून पाहिल्या. अनेकदा अडचणी, संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र या अनुभवांनी पत्रकार म्हणून अधिक संवेदनशील केले. सर्वसामान्य माणसाच्या वेदना, समस्या आणि अपेक्षांना न्याय देण्याची जबाबदारी अधिक दृढ झाली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या संपूर्ण प्रवासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे साथ देणाऱ्या वाचक, प्रेक्षक, पत्रकार बांधव, मित्रपरिवार, जाहिरातदार, हितचिंतक आणि सहकाऱ्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सत्य, निर्भीड आणि जनहिताची पत्रकारिता यापुढेही त्याच ताकदीने सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित नवनिर्वाचित आमदार अविनाश ब्राम्हणकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचाही शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

सहाय्यक आयुक्त तथा तालुका पशुचिकित्सक डॉ. गुणवंत भडके यांचाही त्यांच्या कार्याबद्दल शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

एमपीएससी २०२४ परीक्षेत यश संपादन करून कृषी अधिकारी म्हणून निवड झालेल्या गुणवंत सानिया शेख यांचा सत्कारही आयोजित करण्यात आला होता. मात्र अपरिहार्य कारणास्तव त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या पालकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मंचावर माऊली फाउंडेशनचे संचालक तथा अध्यक्ष आनंद चंद्रिकापुरे, पंचायत समिती सदस्य डॉ. रुकीराम वाढई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल, पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, पंचायत समिती सदस्या वर्षाताई शहारे, रोशन बडोले, गीताई बहुउद्देशीय शिक्षण संस्था सौंदडचे संचालक संतोष राऊत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

दरवर्षी कर्तृत्ववानांच्या सन्मानाची परंपरा

महाराष्ट्र केसरी न्यूज आणि रुद्रसागर न्यूज पेपरच्या माध्यमातून दरवर्षी वर्धापन दिनाच्या औचित्याने समाजातील गुणवंत, विविध क्षेत्रांत पदोन्नती प्राप्त करणारे तसेच आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा, ऊर्जा आणि प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जातो. समाजासमोर अशा व्यक्तींचे कार्य आणून इतरांनाही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ही परंपरा सातत्याने जोपासली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ६ ऑगस्ट रोजी हा वर्धापन दिन व सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान आलेल्या पाहुण्यांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते, तर आलेल्या पाहुण्यांनी भेट वस्तू दिल्या, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने भेट वस्तू देण्यात आली असुन पत्रकार उमरावं मांडरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी शिक्षक विजय मारवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन देशोन्नती वृत्तपत्राचे पत्रकार बिर्ला गणवीर यांनी केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *