स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण; अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्याने मृतदेह दोन तास रस्त्यावर सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव डव्वा येथील प्रकार; गावात तणावाचे वातावरण

शिक्षा

स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण; अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्याने मृतदेह दोन तास रस्त्यावर

सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव डव्वा येथील प्रकार; गावात तणावाचे वातावरण

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव डव्वा येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ठेवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. शांताबाई बिशन बनसोड यांचे 11 ऑगस्ट रोजी निधन झाले. 12 ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावातील स्मशानभूमीत नेण्यात आला असता, स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक 381/2 मधील स्मशानभूमीच्या जागेवर गोवर्धन शेंडे यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. या परिस्थितीत मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर ठेवावा लागल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तसेच नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रशासनाच्या उपस्थितीत शेतातील जागेत मृतदेह दफन करण्यात आला.

स्मशानभूमीसाठी शासनाने निश्चित केलेल्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवून ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *