ब्राम्हणी खडकी बस टॉपवर कथित जादूटोण्याचा प्रकार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
ब्राम्हणी खडकी : ब्राम्हणी खडकी येथील बस टॉपवर गुरुवारी, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास कथित जादूटोण्यासंदर्भातील साहित्य आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बस टॉपवर ये-जा करणारे प्रवासी तसेच शाळकरी मुला-मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी बस टॉपवर ऑटोचालक आले असता त्यांना बस टॉपच्या खांबा जवळ हा प्रकार दिसून आला. त्यांनी तत्काळ ब्राम्हणी येथील पोलीस पाटील खोटेले तसेच उपसरपंच विकास (सोनू) खोटेले यांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिश पाटील खोटेले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बस टॉपवर टाकण्यात आलेले कथित जादूटोण्याचे साहित्य तेथून बाजूला करण्यात आले.
या प्रकारामागे नेमके कारण काय आहे, हे साहित्य कोणी व कशासाठी टाकले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या घटनेची चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ब्राम्हणी खडकी बसटॉपवर दिवसभर शाळकरी विद्यार्थी, महिला-पुरुष प्रवासी तसेच हॉटेल व्यावसायिकांची वर्दळ असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे साहित्य आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची योग्य ती चौकशी करून नागरिकांची भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

