शशीकरण देवस्थानात नवरात्र उत्सवाचा जागर !
११ऑक्टोबरला ज्योत प्रज्वलन; १२ ऑक्टोबरला भव्य एकदिवसीय यात्रा
हजारो वर्षांची श्रद्धा, पण विकास मात्र रखडला!
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक देवस्थान सौंदर्यीकरणापासून वंचित
सडक अर्जुनी : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील देवपायली परिसरातील हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या शशीकरण देवस्थानात ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टच्या वतीने ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ज्योत प्रज्वलन करण्यात येणार असून, १२ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय शशिकरण बाबाच्या भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
शशीकरण बाबा, राणी माता, योगीराज धुनीवाले बाबा आणि भस्मडोह अशी विविध जागृत श्रद्धास्थळे या देवस्थानात आहेत. आदिवासी समाजासह परिसरातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान मानले जाते.
१९६५ पासून बाबांची अखंड सेवा
सन १९६५ मध्ये स्वर्गीय योगीराज धुनीवाले बाबा येथे आले. त्यावेळी जंगल परिसरात असलेल्या या देवस्थानाची त्यांनी कुटी उभारून सेवा व देखभाल सुरू केली. मंदिर परिसरात वीज सुविधा उपलब्ध करून देण्यासह देवस्थानाच्या जतनासाठी त्यांनी आयुष्य वाहिले. सन २००८ मध्ये याच मंदिर परिसरात त्यांचे निधन झाले.
त्यानंतर त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टची स्थापना करण्यात आली.
श्रद्धा मोठी; विकासाची प्रतीक्षा कायम!
ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असतानाही शशीकरण देवस्थान आजही अपेक्षित सौंदर्यीकरण आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची खंत भाविक व्यक्त करीत आहेत. स्थानिक आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी देवस्थानाच्या विकासासाठी ठोस पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
ट्रस्ट सज्ज; भाविकांना उपस्थितीचे आवाहन
ट्रस्टचे सचिव देविदास कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाची तयारी सुरू आहे. अध्यक्ष महेशभाऊ डुंभरे यांच्यासह सुरेश बोरकर, सुखदेवसिंह ठाकूर, राहुल वणवे, गिरीपाल फुले, रमेश ईडपाते, चंद्रकुमार बहेकार, डोमाजी पटणे, लालसिंग चंदेल, सौरभ बडोले, राकेश नंदागवली, डेव्हिड सय्याम डी.एच.पटणे.तसेच संपूर्ण ट्रस्ट पदाधिकारी व भाविक भक्त उत्सवाच्या तयारीत सहभागी आहेत.
शशीकरण बाबांच्या नवरात्र उत्सवात व १२ ऑक्टोबर सोमवारला, भव्य यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

