शशिकरण देवस्थानच्या यात्रेत भाविकांचा महापूर!
अखंड ज्योतीच्या दर्शनासाठी हजारोंची गर्दी; योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टतर्फे भव्य महाप्रसाद
सडक अर्जुनी : ढोल-ताशांचा गजर, देवी-देवतांचा जयघोष आणि अखंड ज्योतीच्या दर्शनासाठी उसळलेला भाविकांचा जनसागर! विदर्भातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शशिकरण देवस्थान येथे योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित भव्य एकदिवसीय यात्रेला हजारो भाविकांनी हजेरी लावली. संपूर्ण विदर्भातून आलेल्या भाविकांच्या गर्दीने देवस्थान परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
नऊ दिवसांपासून प्रज्वलित असलेल्या अखंड ज्योतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती. मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील या श्रद्धास्थानावर पहाडावरील राणी माता, वाघाची कापी, भस्म डोह, शिवपहाडावरील महादेवाची मूर्ती व पिंड, चंडिका माता आणि वाघदेव अशा विविध धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.
ट्रस्टतर्फे महाप्रसाद; सुरक्षा व्यवस्थाही सज्ज
यात्रेत भाविकांसाठी महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य तपासणी केंद्र, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आले होते. तसेच पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे यात्रा शांततेत पार पडली.
१९ ऑक्टोबरला ज्योती विसर्जन, गोपालकाला व कन्याभोजन
नवरात्रोत्सवाच्या समारोपानिमित्त १९ ऑक्टोबर रोजी ज्योती विसर्जन, गोपालकाला आणि कन्याभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष महेश डुंभरे, सचिव देविदास कोवे, गिरीपाल फुले, आनंद चंद्रिकापुर. माधोराव तरोने. अनिल मुनिश्वर रमेश ईडपाते, चंद्रकुमार बहेकार, राहुल वनवे, सौरभ बडोले, राकेश नंदागावली, सुखदेवसिंह ठाकूर, सुरेश बोरकर, दुडीश्वर लांजेवार यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविक भक्तांनी सहकार्य केले.

