पहाटेच्या सापळ्यात सागवान तस्कर अडकले! वन विभागाची डोंगरगाव डीपो येथे धडक कारवाई; बोलेरोसह तीन आरोपी ताब्यात

अपराध करियर महाराष्ट्र शिक्षा

पहाटेच्या सापळ्यात सागवान तस्कर अडकले!

वन विभागाची डोंगरगाव डीपो येथे धडक कारवाई; बोलेरोसह तीन आरोपी ताब्यात

सडक अर्जुनी: जंगलसंपत्तीची खुलेआम लूट करणाऱ्या सागवान तस्करांवर वन विभागाने पहाटेच्या अंधारात मोठा घाव घातला आहे. गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत सागवान लाकडाने भरलेले बोलेरो पिकअप वाहन पकडण्यात आले असून तीन आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.

माहितीनुसार, सहवनक्षेत्र डोंगरगाव डेपो व पांढरवनी बफर परिसरातील वन कर्मचाऱ्यांनी रात्रीपासूनच संशयित हालचालींवर पाळत ठेवली होती. पहाटे सुमारे ४ वाजता मौजा डोंगरगाव येथील साले-धारणी-डोंगरगाव मार्गावरून बोलेरो पिकअप क्रमांक MH-35-AJ-1154 संशयास्पदरीत्या जात असल्याचे दिसून आले. वन पथकाने वाहन अडवताच तस्करांची धावपळ उडाली.

तपासणीदरम्यान वाहनामध्ये मौल्यवान सागवान लाकूड आढळून आले. वन अधिकाऱ्यांनी तत्काळ वाहन जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात अवैध वृक्षतोड व लाकूड तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. क्षेत्र सहाय्यक कु. व्ही. बी. रहिले व सी. एस. डोरले यांच्या मार्गदर्शनाखाली पवन कांबळे, मेहबूब सय्यद, विवेक काईट, सहसराम हटवार, माधव मुसळे, वनिता ब्राह्मणकर, शालू मेंडे, यशवंत शेंडे, श्रीकांत बंसोड आणि समीर बंसोड यांनी धाडसी भूमिका बजावत तस्करांचा डाव उधळून लावला.

वन विभागाच्या या कारवाईने जंगलमाफियांना स्पष्ट इशारा दिला असून, जंगल संपत्तीवर डल्ला मारणाऱ्यांविरुद्ध यापुढे आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *