देवरी वनपरिक्षेत्रात अवैध सागवान वृक्षतोड उघड; चार आरोपींना अटक, सागवान जप्त
गोंदिया : गुप्त माहितीच्या आधारे देवरी वनपरिक्षेत्रातील बिट मुल्ला अंतर्गत मौजा सुब्रयटोला हद्दीतील कक्ष क्रमांक 586 पी.एफ. परिसरात वन विभागाने धडक कारवाई करत अवैध सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश केला. संशयित वाहनाला थांबवून चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने वन कर्मचाऱ्यांनी परिसरात गस्त घातली. यावेळी सागवानाच्या चार झाडांची अवैध तोड झाल्याचे निदर्शनास आले.
तपासादरम्यान संशयितांकडून मुख्य आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला घटनास्थळी बोलावून संपूर्ण दस्तावेजी कार्यवाही करण्यात आली. मा. वनपरिक्षेत्र अधिकारी, उत्तर देवरी यांच्या आदेशान्वये संबंधित आरोपींविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला.
कारवाईदरम्यान सागवानाचे ४ नग ओंडके (०.३६७ घनमीटर) जप्त करण्यात आले. या प्रकरणात रविंद्र श्रीराम पातोडे (३६), राधेश्याम श्रीराम पातोडे (२७), दुर्गेश बाबूलाल शेंडे (३४) व विकास अशोक नंदेश्वर (४२), सर्व रा. चारभाटा यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींविरुद्ध वनगुन्हा क्रमांक ०४२७३/०६८२२/२०२६ अंतर्गत भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 41, 42(1)(2) व 52(1) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई एस. यू. चव्हाण (बीट रक्षक, मुल्ला), एस. टी. बाम्हणवत, एस. सी. गायकवाड, जे. एस. केंद्रे, कु. एस. डी. धनबाते व एल. आर. येळेकर या वनरक्षकांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
वन विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून जंगल संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी विभागाकडून अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

