मोटारसायकलच्या जोरदार धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू; सडक अर्जुनीत दुर्दैवी घटना
सडक अर्जुनी : येथील महावितरण (MSEDCL) कार्यालयासमोर मोटारसायकलच्या धडकेत एका ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतकाचे नाव दिनेश मेश्राम (वय 50 वर्षे) असे असून ते जवाहरनगर, जिल्हा भंडारा येथील रहिवासी होते. प्राप्त माहितीनुसार, दिनेश मेश्राम हे ट्रक घेऊन गोंदियाकडे जात होते. सडक अर्जुनी येथील पेट्रोल पंपाजवळ त्यांनी आपला ट्रक उभा करून जेवणासाठी पायी महावितरण कार्यालयाच्या दिशेने जात असताना भरधाव मोटारसायकल चालकाने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुखापत इतकी गंभीर होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दीपक खोटेले, मेजर मुळे, मेजर वाघाडे व महेंद्र चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
या प्रकरणाचा पुढील तपास डुग्गीपार पोलिस करीत आहेत.

