अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल चालक गंभीर जखमी देवपायली येथील घटना; पत्नी व दोन लहान मुलेही जखमी

शिक्षा

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल चालक गंभीर जखमी

देवपायली येथील घटना; पत्नी व दोन लहान मुलेही जखमी

सडक अर्जुनी : कोहमारा येथून देवरीच्या दिशेने मोटारसायकलने जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल चालकासह पत्नी व दोन लहान मुले जखमी झाल्याची घटना दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास देवपायली येथे घडली.

या अपघातात मोटारसायकल क्र MH 35 BD 3310 चालक रामचंद्र सुंदरलाल पेंदाम (वय 34 वर्षे) यांच्यासह त्यांची पत्नी व मुले चिराग रामचंद्र पेंदाम (वय 5 वर्षे) आणि स्वरंश रामचंद्र पेंदाम (वय 3 वर्षे) जखमी झाले. अपघातात रामचंद्र पेंदाम गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सुरेश बोरकर यांनी डुग्गीपार पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय कोटांगले यांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील चौकशी सुरू केली.

जखमींना तातडीने 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोंदिया येथे हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातानंतर धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले असून, डुग्गीपार पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *