स्पीड ब्रेकर ठरला काळ”! सोलापूरवरून रायपूरकडे चिकू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण* *अपघात…सौंदड उड्डाणपुलाच्या सुरुवातीला कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक; लातूरच्या चालकाचा जागीच मृत्यू, क्लीनर गंभीर जखमी…

शिक्षा

स्पीड ब्रेकर ठरला काळ”! सोलापूरवरून रायपूरकडे चिकू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण* *अपघात…सौंदड उड्डाणपुलाच्या सुरुवातीला कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक; लातूरच्या चालकाचा जागीच मृत्यू, क्लीनर गंभीर जखमी…

 

सडक अर्जुनी: गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सौंदड येथील नुकत्याच सुरू झालेल्या उड्डाणपुलाच्या सुरुवातीला असलेल्या ब्रेकरवर आज रात्री एक भीषण अपघात घडला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून चिकू भरून रायपूरकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने समोरील कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, क्लीनरचा पाय फ्रॅक्चर झाल्याने तो गंभीर जखमी आहे. ही घटना १४ ऑक्टोबर च्या रात्री १०:३० च्या सुमारास घडली. 

 

  विशेष म्हणजे, ७ ऑक्टोबर रोजीच या उड्डाणपुलावरील एकतर्फी वाहतूक सुरू करण्यात आली होती. वाहतूक सुरू झाल्यानंतर अवघ्या ७ दिवसांतच हा भीषण अपघात होऊन एका निष्पाप चालकाचा बळी गेला आहे. सौंदड येथील उड्डाणपुलाच्या सुरुवातीला असलेल्या स्पीड ब्रेकरवर समोरील कंटेनर ट्रकने (वाहन क्रमांक: MP09 BG9414) आपला वेग कमी केला होता. मात्र, मागून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकचे (वाहन क्रमांक: MH 04 GC 9436) नियंत्रण सुटले आणि त्याने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की आयशरच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात आयशर चालक नागनाथ संजय कराळे (वय ३६, रा. तिवटघाट, ता. चाकूर, जि. लातूर) यांचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला, तर क्लीनर अनिकेत महादेव उदावळे (वय २३, रा. तिवटघाट) याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन तो फ्रॅक्चर झाला. अपघात झाल्यानंतर डायल ११२ वरून माहिती मिळताच डुग्गीपार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. जखमी क्लीनर अनिकेत याला तातडीने प्राथमिक उपचारासाठी सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृत चालक नागनाथ यांचा मृतदेह सडक अर्जुनी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अपघातग्रस्त कंटेनरच्या चालकाने (धर्मेंद्र गोस्वामी, रा. मध्य प्रदेश) रात्रीच आपले वाहन डुग्गीपार पोलीस ठाण्यात जमा केले व तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी मृत चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जागेश्वर उईके करत आहेत. सौंदड येथील या उड्डाणपुलावर नुकतीच एकतर्फी वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी, पुलाच्या सुरुवातीलाच असलेले गतिरोधक (ब्रेकर) आणि अपूर्ण काम वाहनधारकांसाठी मोठी धोक्याची घंटा ठरत आहे. पुल सुरू होऊन आठवडा उलटत नाही तोच झालेल्या या भीषण अपघातामुळे, “झालेल्या अपघाताला आणि चालकाच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *